उपक्रम

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदत

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात अनेक गावांचे पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाने कोंडिवते गावातील पूरग्रस्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि शाळेस संगणक संचाचे वितरण केले. समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाचे खजिनदार गणेश काळे, माजी विद्यार्थी निसार चौगुले, सोपान गोंटला, लक्ष्मण जाधव, गणेश ननवरे, कोंडिवते ग्रामपंचायतचे सरपंच सुनील डावरुंग, शाळेचे मुख्याध्यापक गौतम वानखेडे, पोलिस पाटील धोंडिराम डिगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अध्यक्ष महेंद्र डिगे, ग्रामपंचायत सदस्य राजाराम शिंदे या वेळी उपस्थित होते. मंडळाचे सल्लागार अॅड. देविदास टिळे यांनी नियोजन केले. मंडळाच्या या दातृत्वाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, अशी भावना कोंडिवते ग्रामस्थांनी व्यक्त केली.

कोरोना-काळात,
अन्नसेवा

वसतिगृहाच्या मेसचा उपयोग करून अक्षयपात्र संस्थेच्या सहयोगाने अन्नसेवा देण्याविषयी एकमत झाले. समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड यांनी अक्षयपात्र संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना ही संकल्पना सांगितली. भारतभर अन्नसेवेत काम करणाऱ्या या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काही तांत्रिक बाबी समजून घेत त्याला तात्काळ मंजुरी दिली. रोज सकाळी आणि संध्याकाळी हे जेवण उपलब्ध होण्याची व्यवस्था पक्की झाली. गणेश काळे यांनी इच्छुकांची यादी तयार केली. मग व्हॉटस अप, फेसबुकच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या ग्रुपवर ही माहिती पोचवली गेली. दुबईतील विजय कदम, पुण्यातील मनीषा गोसावी, राजेंद्र ततार, नंदकुमार पन्हाड, जिभाऊ शेवाळे, राजू इंगळे, निसार चौगुले हा गट कामाला लागला. स्वतः चा निधी जमा करत इतरांना आवाहन केले गेले. आणि आश्चर्य म्हणजे बारा तासांच्या आत तब्बल १०० माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी २५०० रुपये मंडळाच्या खात्यावर जमा करत १० हजार भोजनांची सोय झाली. कार्यकारी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी या शंभरीचे कौतुक केले. सर्वांच्या एकीचा आणि समाधानाचा हा अलौकिक क्षण नोंदला गेला.

माजी विद्यार्थी मेळावा

दरवर्षी फेब्रुवारी च्या शेवटच्या रविवारी हा मेळावा आयोजित केला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विखुरलेले व आपापल्या क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत असलेली हे समितीचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी ह्या दिवशी आवर्जून उपस्थितीत राहतात. आत्तापर्यंत ३३ मेळावे झाले आहेत. दरवर्षी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागांना किंवा जिल्ह्यानुसार ह्या मेळाव्याच्या आयोजनाची जबाबदारी दिली जाते. ह्या वर्षी ३४ व्या मेळाव्याची जबाबदारी मुंबई व कोकण विभागाने सांभाळली.

समिती आशीर्वाद वृक्ष

सुरक्षा जाळीसह वृक्षांचे वितरण

‘विद्यार्थी साहायक ‘समिती’च्या माजी विद्यार्थी मंडळाच्या आशीर्वाद वृक्ष उपक्रमांतर्गत ‘कल्याणी टेक्नोफोर्ज’च्या सहकार्यातून बीड जिल्ह्यातील वारणी जिल्हा परिषद शाळेत आशीर्वाद वृक्षांचे लोखंडी 

सुरक्षा जाळीसह वितरण करण्यात आले. या वेळी गट शिक्षणाधिकारी जमीर शेख, समितीचे माजी विद्यार्थी सुनील चोरे, गणेश काळे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन जायभाये यांनी मार्गदर्शन केले.  या वेळी १९८७- ९१ बॅचचे माजी विद्यार्थी काशिनाथ. जगताप, प्रकाश बढे, ज्ञानदेव केदार, दिलीप जायभाये यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी आशीर्वाद वृक्षांचे पालकत्व घेतले.

Open chat
नमस्कार 👋
मी कशाप्रकारे आपली सहायता करू शकतो